Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

सौंदर्य वाढविण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय.....

 
By : Anuradha Velankar      On: December 04, 2010
490359 Visits   
Report Abuse
http://anuradhavelankar.globalmarathi.com
आपल्या घरच्या वस्तूंपासून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. घरगुतीच उपाय करून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. बाजारातील केमिकल असलेल्या वस्तू वापरण्यापेक्षा घरच्या वस्तू वापरल्या तर आपण आपल्या त्वचेची जास्ती काळजी घेऊ शकतो.

१) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन/तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहर्‍याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15 मिनिटांनी काढून टाकावी.

२) डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपताना करावा.

३) डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

४) सावळेपणा दूर करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आपण जर घरच्या घरीच काही उपाय केले तर त्वचेचा सावळेपणा काही अंशी दूर होऊ शकतो. एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. ‍सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्‍यावर व पूर्ण शरीरावर लावावी.

५) ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्‍छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.

६) हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीतकमी सात दिवस तरी करावे. डाग कमी होतील.

७) चेहरयावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावावा. सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

८) कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा सायीमध्ये लिंबाचा रस पिळून त्याला तोंड आणि मानेवर थोडा वेळ लावावे, आणि थोड्या वेळाने धुऊन टाकावे. चेहर्‍याला ब्लीच केल्यासारखे वाटेल. त्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनेल.

९) पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्‍यावर चोळावी. यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा.

१०) केसांमधील कोंडा घालविण्यासाठी आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे व साधारणपणे १५ ते २० मिनिटांत केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रस केसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

११) हिवाळ्यात पावलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडावेळ कोमात पाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावे.

१२) नखांची स्वच्छता ठेवण्यासाठी गरम पाण्याने हात धुवावेत म्हणजे नखं लगेच स्वच्छ होतात. लांब नखं असतील हात धुतांना काळजी घ्यावी, कारण गरम पाण्याने हात धुतल्याने नखं मऊ होऊन तुटू शकतात.

 Name :
* Comment : Type in  
0/500
Top