Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
आरोग्यासाठी तंत्रज्ञान
GlobalMarathi
Friday, October 08, 2010 AT 12:20 PM (IST)
आजच्या काळात नियमित वैद्यकीय तपासण्या हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पण कार्यबाहुल्यामुळे त्यात चालढकल होते. नियमित तपासण्या करणे मनात असूनही विसरल्या जातात. त्यातून गुंतागुंत निर्माण होते आणि उपचारासाठी जास्त वेळ आणि पैसा खर्च होतो. हे सर्व टाळण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी www.arogyamitra.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.रुग्णांनी वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार घ्यावेत या साठी पुण्यातील काही संगणक अभियंत्यांनी निर्माण केलेली ही संगणक प्रणाली अनेक सुविधा पुरवते. या प्रणालीत डॉक्टर्स आपपल्या रुग्णाला आवश्यक असलेल्या एका किंवा अनेक सेवांसाठी नाव नोंदणी करु शकतात. लसीकरणाच्या तारखांची आठवण, गरोदरपणातील नियमित तपासण्या, ह्र्दयरोग, मधुमेह आणि मुत्रविकाराचे रुग्ण यांना वेळोवेळी आठवण करुन देणारे एस.एम.एस. पाठविण्याची सुविधा यात करण्यात आली आहे. रुग्णांनी स्वतःही संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा यात उपलब्ध आहे.

या शिवाय डॉक्टरांच्या भेटीसाठी नियोजित वेळेची आठवण करण्यासाठी एस.एम.एस. पाठवण्याची सोय या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच काही कारणाने डॉक्टरांना थोडा उशीर होणार असल्यास सर्व रुग्णांना तशी माहिती कळवता येईल. रुग्णांनाही डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी या संकेतस्थळावर सोय करण्यात येत आहे. डॉक्टर त्यातील काही प्रश्नांची उत्तरे एस.एम.एस पाठवून देऊ शकले तर रुग्ण व डॉक्टर या दोघांचा वेळ वाचण्यास मदत होईल.दवाखाने, रुग्णालये, विषेशज्ञ आणि औषधांची दुकाने व निरनिराळ्या तपासण्या करुन देणा-या संस्थांची डिरेक्टरी आरोग्यमित्र या संकेत स्थळावर तयार करण्यात येत आहे. इतर अनेक सुविधा या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येतील. त्यातील बहुतेक सुविधा रुग्ण व डॉक्टर्ससाठी मोफत असतील. काही सुविधांसाठी वापरावर अवलंबून, नाममात्र आकार घेण्यात येईल. परंतू आठवणीचे एस.एम.एस करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात वापर वाढवणे हे या संकेतस्थळाचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि डॉक्टरांनी या सेवा वापरल्या तरच हे उद्दीष्ट साध्य होईल याची आरोग्यमित्र टीमला कल्पना आहे.डॉ. राजीव जोशी ह्या संकेतस्थळाचे निर्माते स्वतः ह्या प्रणालीचा प्रभावी वापर करत आहेत. त्यांच्याकडे नियमित येत असलेल्या रुग्णांना त्यांनी या प्रणाली व्दारे स्वाइन फ़्लूची लस घेण्याविषयी एसएमएस पाठविले. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. आठवड्याला येत असलेल्या शेकडो जाहिरातींच्या एस.एम.एस पेक्षा हा आम्हाला अधिक मोलाचा वाटला. आम्हाला ही जाहिरात वाटली नाही. उलट एस.एम.एस. व्दारे आठवण करुन दिल्या बद्द्ल आभार असे त्यांच्या काही रुग्णांनी सांगितले.

त्याचप्रमाणे एखाद्याला विशेष सेवा हवी असल्यास त्यांच्या गरजेप्रमाणे संगणक प्रणाली उपलब्ध करुन देण्याचा अभियंत्यांचा मानस आहे. त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या जीवनात या संकेतस्थळाचा वापर करुन रुग्णांना नियमित वैद्यकीय मदत घेऊन निरामय जीवनाचा लाभ घेता येईल.
 
- शब्दांकन गौरी शिकारपूर

प्रतिक्रिया
 
On 12/12/2013 05:01 PM satish deshpande said:
खूपच चांगली कल्पना आहे.धन्यवाद.