Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

नाती : न -अती !!!

 
By : Shilpa Inamdar      On: October 18, 2012
11093 Visits   
Report Abuse
http://shipci_9995.globalmarathi.com

नाती नेमकी कशी असतात ? कशी असावीत ? आज मला अचानक असा प्रश्न का पडला कोणास ठाउक ? आणि झालं सुरू विचारचक्र !! असं जाणवलं की ही रिलेटिव कन्सेप्ट आहे पण २ गोष्टी मात्र नक्की :-

१. नाती कधीही लादलेली नसावीत.

२. त्यातला ओलावा कधीच एकतर्फी असू नये .

अर्थात हे माझं मत आहे.


कसं असतं की, आयुष्यात काही नाती आपण जन्माला येताना घेउनच येतो आणि काही नंतर निर्माण करतो ! जी घेऊन येतो त्यांना पर्याय नसतो आणि जी निर्माण करतो त्यांना आपण 'जबाबदार ' असतो. पहिल्या प्रकाराविषयी सांगायचं तर ती जशी असतील , वाटयाला येतील तशी तुम्हांला स्विकारावीच लागतात . कधी कधी तोडता येत नाहीत म्हणून टिकवावीही लागतात . पण माझं वैयक्तिक मत असं आहे की, अशा वेळी स्वतःला त्यातून वेगळं करता ; अलिप्त होता आलं पाहिजे कारण मनं साफ नसतील तर त्या नात्याला काहीही अर्थ नसतो ...आणि जरी तुटली तरी कुणालाच फरक पडणार नसतो . जगाला दाखवण्यासाठी राखलेल्या आणि लादलेल्या नात्यांचा खरंच खूप तिटकारा येतो . आणि मुळात मला एखादयाविषयी मनापासून 'वाटणं ' आणि त्याच्याशी असलेल्या नात्याच्या 'ऑबलीगेशन ' मुळे किंवा कर्तव्य म्हणून काहीतरी 'वाटणं ' किंवा मी ते 'करणं ' यात जमीन -अस्मानाचा फरक असतो . बरेचदा आपण अशी ओझी वाहत असतो ... एकतर्फी प्रयत्न देखील करत असतो ती सांधायचा.. कदाचित गरज नसताना . या नात्यांना टिकायला , फुलायला वेळ नक्की द्या , संधीही द्या पण सगळं करूनही जर समोरच्या कडून प्रतिसादच मिळत नसेल किंवा तो स्वतःला अवाजवी महत्व देऊन घेऊन परत आपल्यावरच उपकार केल्यासारखं वागत असेल तर खुश्शाल रामराम ठोका !!! कारण रूल नंबर "२" :)


आता जी नाती 'आपण निर्माण ' करतो त्याविषयी . इथे मात्र आपली जबाबदारी नक्कीच वाढते कारण अशी नाती लादलेली नसतात ! [ रूल नंबर १] अशी नाती एकतर्फी असूच शकत नाहीत किंवा एकटी व्यक्ती फक्त तिला वाटतं म्हणून निर्माणच करू शकत नाही. खरंतर अशा नात्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं यापेक्षा समोरच्यालाही तसंच वाटतं का ? याला जास्ती महत्व असतं ! मला काय वाटतं हे मी नक्कीच ठरवू शकते पण समोरच्याला काय वाटावं ? त्याने कसं वागावं हे मी कधीच ठरवू शकत नाही किंवा ठरवू नये. आणि जर हा फंडा पक्का असेल आणि तुमचा एखाद्याचा बाबतीत भ्रमनिरास झाला तर दोष कुणाचा? लोकं दुसऱ्यांना का कोसतात ? त्यांनी आपल्या अपेक्षेप्रमाणेच वागावं असा अट्टाहास का धरतात ? आणि मग स्वतःच दुखावले जातात . अशी नाती त्रासदायक च होतात .मान्य आहे नातं कुठलंही असलं तरी त्याच्याकडून अपेक्षा असतातच ; मानवी वृत्ती आहे ही आणि त्यात गैर काहीच नाही पण "गोची" तेव्हा होते जेव्हा आपण गृहीत धरायला लागतो एखाद्याला !!! इथेच ती नात्यातली धूसर रेषा असते जी पार केली गेली तर नात्यांचे 'बंध ' नाही तर 'बंधन' वाटायला लागते आणि दरी निर्माण व्हायला सुरुवात होते !!


मला नेहमी वाटत आलं आहे जेव्हा मनं जुळतात ना तेव्हा नाती कधीच "टिकवावी " लागत नाहीत ती आपोआप निभावली जातात ! मग त्यात अवाजवी अधिकारही नसतो आणि अपेक्षाही ; असते ती फक्त ओढ , आस जी दोन्ही बाजूंनी सारखीच असते :) अशा निर्माण केलेल्या किंवा झालेल्या नात्यातून नेहमी समाधानच मिळतं. त्यात एकमेकांना साथ देणंही असतं आणि मुभाही. एकमेकांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती असलीच पाहीजे हा आग्रह ही नसतो आणि गरज पडली तर वाट्टेल ती वाट्टेल तेव्हा मदत करायची तयारीही असते. "ज्यात कुठलीच गोष्ट ना अती तीच खरी नाती!!!" हीच खरी 'नात्यांची व्याख्या ' म्हणता येईल, हो नं !!!


जाता जाता एका छानश्या संग्रही कवितेच्या काही ओळी आठवताहेत ,


कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये

की आपल्याला त्याची सवय व्हावी

तडकलेच जर हृदय कधी तर

जोडताना असह्य यातना व्हावी ...

कुणाला इतकाही वेळ देऊ नये की

आपल्या प्रत्येक क्षणावर त्याचा अधिकार व्हावा

आपल्या ओठातूनही मग

त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा !


कुणाला इतकंही 'माझं ' म्हणू नये की

त्याचे 'मी पण ' आपण विसरावे

त्या संभ्रमातून त्यानेच आपल्याला

' ठेच ' देऊन जागे करावे


पण म्हणून कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये की,

आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे..

दूर दूर आकांताने साद घातली तरी

आपले शब्द जागीच घुमावे !!!


बरंय तर मग मंडळी या विषयावर नक्की विचार कराल अशी आशा ठेवते आणि तुमच्या प्रतिक्रियांची नेहमीसारखी आस मनात ठेऊन इथेच थांबते !


- शिल्पा इनामदार - यज्ञोपवित .


 Name :
* Comment : Type in  
0/500
Top