Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हनुमान

Wikepedia
Friday, April 06, 2012 AT 10:24 AM (IST)


हनुमान हा रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली.

सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने मारून फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.
पुढे राम वनवासात फिरत असताना त्याच्याशी हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला.

रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले.

या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणार्‍या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.|| श्री हनुमान स्तुती ||

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||१||

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||२||

गिळायासी जाता तया भास्करासी |
तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||३||

खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |
म्हणोनी तया भेटला रावणारी ||
दयासागारू भक्तीने गौरविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||४||

सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||५||

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||
नमू जावया लागी रे मोक्षपंथा |
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||


|| मारुती स्तोत्र ||

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें | सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||
धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

संधर्भ : Wiepedia
हनुमान