Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

उमा भारती मुख्यमंत्रीपदाच्या उमेद्‌वार नाहीत

eSakal
Tuesday, January 24, 2012 AT 08:16 AM (IST)
लखनौ - कोणताही चमत्कारिक निकाल लागून भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले, तरी उमा भारती या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार नसतील, असा ठाम विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केला. मिश्रा स्वत: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मिश्रा यांनी उमा भारती यांचे कौतुक केले. मात्र, त्याचबरोबर त्या भाजपच्या उत्तर प्रदेशातील संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार नसतील हेदेखील स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री पदासाठीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कलराज मिश्रा, पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, सूर्यप्रताप शाही यांच्यासह उमा भारती यांचे नावही घेतले होते. त्याचा संदर्भ देऊन मिश्रा यांनी सांगितले, की गडकरी असेही म्हणाले होते, की शाही हे सध्याचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते दोन पदे एकावेळी सांभाळू शकत नाही. तर, राजनाथ सिंह यांनी मला राज्यातील राजकारणात रस नाही, असे अगोदरच जाहीर केले आहे आणि उमा भारती या उत्तर प्रदेशातील नाहीत. त्या परराज्यातील आहेत. याचाच अर्थ मी मुख्यमंत्रीपदाचा मी एकमेवप्रमुख दावेदार आहे, असेही मिश्रा यांनी ठासून सांगितले.