नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले. आतापर्यंत त्यांनी तीन ट्विट्स केल्या असून सुरवातीलाच 6,950 फॉलोअर्स जमा झाले आहेत. @PMOIndia या नावाने मनमोहनसिंग यांनी ट्विटरवर आपले अकाऊंट उघडले आहे. पंतप्रधान कार्यालयातील संपर्क विभाग पंतप्रधानांच्या वतीने हे अकाऊंट सांभाळणार आहे. मंगळवारी उशीरा अकाऊंट सुरू केल्यावर तीन ट्विटस् करण्यात आल्या. आतापर्यंत 6,950 फॉलोअर्स तयार झाले आहेत. मीडियाच्या संपर्कात राहत नसल्याची पंतप्रधानांवर वारंवार टीका करण्यात येते. ते क्वचितच बातमीदारांना मुलाखती देतात, असेही म्हटले जाते. त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून जनसंपर्क साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकारी म्हणाला,""पंतप्रधान कार्यालयाकडून भरपूर काम केले जाते. एका वर्षांत पंतप्रधानांचे 30 ते 40 विदेश दौरे होतात. मात्र याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नाही. ट्विटरवरील अकाऊंटच्या मदतीने जनतेपर्यंत ही माहिती नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.