Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गिरणी कामगार आज करणार मुख्यमंत्र्यांचा निषेध

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:40 PM (IST)
मुंबई - गिरणी कामगारांच्या घरांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने काहीच चर्चा केली नाही आणि निर्णयही घेतला नाही. म्हणून सर्व गिरणी कामगार संघटनांचे नेते आणि गिरणी कामगार उद्या (ता. 24) दुपारी आझाद मैदानात जमून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करणार आहेत. यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनातच आश्‍वासन दिल्याप्रमाणे राज्य सरकारने सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली होती मात्र त्यात सरकारच्या आधीच्या आश्‍वासनांच्या पूर्ततेबाबत गिरणी कामगार नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यामुळे त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते, की सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ मात्र हिवाळी अधिवेशनात याप्रश्‍नी चर्चा तर झाली नाहीच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत. तथापि, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी पक्षांच्या जाहीरनाम्यांतही गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्‍नाचा साधा उल्लेखही नसल्याचे समजते.