Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

आघाडीच्या जाहीरनाम्याचा मराठीचा पदर

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:10 PM (IST)
मुंबई - मायानगरी मुंबईत मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांचे राजकीय महत्त्व असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी मराठीचा मुद्दा त्यांच्या संयुक्‍त जाहीरनाम्यात ठळकपणे मांडणार आहेत. महानगरातील इतर नागरी समस्यांसोबतच मराठी शाळा आणि मराठी ग्रंथालये यांच्या विकासाला चालना देणारा कार्यक्रम आघाडीच्या जाहीरमान्यात समाविष्ट करण्यात आला आहे. "राष्ट्रवादी'ने या कार्यक्रमाचा आराखडा तयार केला असून, कॉंग्रेस नेत्यांनी हा मुद्दा मान्य केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं आघाडी आणि मनसेसोबतच आघाडीच्या जाहीरनाम्यालाही मराठी अस्मितेचा पदर लाभणार आहे. मुंबई महानगरात रस्ते, वाहतूक, पाणी, रस्त्यावरील खड्डे, आरोग्य या समस्यांचा विळखा आहे. मात्र, या नागरी समस्यांहून अधिक मराठी अस्मितेचा बोलबाला मोठा असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला हा मुद्दा टाळता येत नाही. मुंबईतल्या मराठी शाळांची दुरवस्था टोकाला पोचली आहे. या शाळांत मराठी मुलांच्या गळतीचे प्रमाण भरमसाट वाढले आहे. 8.5 लाख विद्यार्थी मराठी शाळेत शिकत होते. मात्र, शिक्षणाच्या उत्तम सुविधा आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळत नसल्याने हा आकडा चार लाखांपर्यंत घसरला आहे.