
मुंबई - शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीच्या वाटेवर आणल्यानंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतची मैत्री कायम असल्याचे ठणकावून सांगितले. तर, बाळासाहेबांच्या टीकेत कधीही द्वेष नसतो. राजकारणात मतभिन्नता असली तरी आमचे आपुलकीचे बंध कायम आहेत, असे सांगत श्री. पवार यांनी त्यांच्या मैत्रीचे धागे कच्चे नसल्याचे स्पष्ट केले. आज शिवसेनाप्रमुखांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी परस्परांबाबतच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या. मातोश्री येथे रूद्राक्षतुला झाल्यानंतर बाळासाहेब यांनी शरद पवार हे आपले मित्र आहेत. सध्या त्यांच्या आणि आमच्या पक्षात राजकीय वाद सुरू असला, तरी आमची मैत्री कायम आहे, असे उद्गार काढले. तर एका खासगी दूरचित्रवाहिनीवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, "बाळासाहेबांची प्रकृती ठणठणीत राहो,' अशी सदिच्छा श्री. पवार यांनी दिली. 'बाळासाहेबांनी एक पिढी घडवली. राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात स्थान दिले. त्यांना मोठे केले,'' असे गौरवोद्गारही श्री. पवार यांनी काढले.