Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पश्‍चिम रेल्वेचा गोंधळ सुरूच

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:10 PM (IST)
मुंबई - वांद्रे लोकलने सोमवारी (ता. 23) सकाळी 9 च्या सुमारास सिग्नल चुकविल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी पाऊण तास कोलमडली. त्यामुळे खचाखच भरलेल्या लोकलच्या रांगा लागून प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत होण्यास दुपार झाली. रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. उपनगरी रेल्वे वाहतुकीवर काही दिवसांपासून बोजवारा उडाला आहे. मध्य रेल्वेच्या एक दिवसाआड कोलमडणाऱ्या वाहतुकीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. चर्चगेट-बोरिवली लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजता वांद्रे स्थानक सोडल्यानंतर खार रोड स्थानकाजवळ धोक्‍याचा सिग्नल ओलांडला. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोसळले. या ठिकाणी गाडी तब्बल 45 मिनिटे थांबविण्यात आली. त्यामुळे चर्चगेटहून येणाऱ्या गाड्या खोळंबल्या. वांद्रे ते चर्चगेटदरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या तर प्रवाशांनी रुळावर उतरून नजीकचे स्थानक गाठले. पर्यायी व्यवस्था म्हणून वांद्रे ते खार रोडदरम्यान डाऊन मार्गावरील लोकल डाऊन फास्ट मार्गावरून चालविण्यात आल्या. सिग्नल ओलांडलेल्या लोकलवर नवीन मोटरमनची नियुक्‍ती करून ती बोरिवलीला रवाना करण्यात आली.