नेरूळ - राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांपासून आमदार-खासदारांना आपल्याकडे ओढण्याची अहमहमिका सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे. नेत्यांच्या या डावपेचाने राजकीय समीकरणेच बदलू लागली आहेत. शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिकांचे पित्त खवळले असतानाच राष्ट्रवादीचे नेते व खासदार संजीव नाईक यांनी विकासाचा 'संजीव'न रथ "आनंदा'ने हाकणार असल्याचे सांगून शिवसेनेला आव्हानच दिले आहे. या संदर्भात खासदार संजीव नाईक यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले, 'आनंद परांजपे व माझी ओढ ही ठाण्याचा विकास करण्याची होती. परांजपे यांनी ज्या विकासाच्या विचाराने राष्ट्रवादीशी जवळीकता दाखवली आहे, त्यामुळे यापुढील काळात दोघेही हातात हात घालून ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास साधणार आहोत.