मुंबई - मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गात अडथळा ठरणारा अंधेरी पादचारी पूल पाडला जाणार नाही. या पुलावरूनच मेट्रो जाणार असून त्याचा केवळ काही भाग पाडावा लागणार आहे. त्या ठिकाणी एक वळणदार 'गर्डर' टाकून हा पूल "जैसे थे' ठेवला जाईल, असे एमएमआरडीएमधील (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) सूत्रांनी सांगितले. अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा आणि "मार्केट ब्रिज' म्हणून ओळखला जाणारा हा पूल पादचाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाने जाणारी मेट्रो या पुलाजवळून आणि पश्चिम रेल्वेमार्गाला छेदून जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मेट्रोचा पूल उभारण्याचे प्राथमिक काम सध्या सुरू आहे. पादचारी पुलाला काहीसा तिरका जाणारा हा पूल एका ठिकाणी त्या पुलाला छेद देणार आहे. या पादचारी पुलावरून मेट्रोचा पूल बांधताना त्यांच्यात विशिष्ट अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पादचारी पुलाचा संबंधित ठिकाणचा काही भागच पाडला जाईल आणि तिथे वळणदार "गर्डर' बसवले जातील. मात्र या कामासाठीही काही दिवस पादचारी पूल बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे.