मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत मुलांना आणि जवळच्या नातेवाइकांना उमेदवारी मिळावी, यासाठी कॉंग्रेस आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे मात्र आमदारांच्या मुलांना तिकिटे देण्यास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध वाढू लागला आहे. लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना तिकिटे देण्याबाबत धोरण ठरवा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने केली असून पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस आमदार रमेशसिंह ठाकूर यांनी मुलगा किंवा मेव्हण्याला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे. खासदार संजय निरूपम यांनी "पीए' विश्वबंधू राय आणि जॉर्ज अब्राहम यांच्यासाठी ताकद लावली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार नसीम खान भावासाठी प्रयत्न करत आहेत. महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजहंस सिंह, जगन्नाथ शेट्टी, कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, मधु चव्हाण हे आमदारही मुलांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार अस्लम शेख यांनी बहिणीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षनेत्यांची मनधरणी चालवली असून पत्रव्यवहारही केला आहे.