मुंबई - महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय नेते व निवडणूक आयुक्तांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. आयोगावर टीकाटिप्पणी करणाऱ्या राज ठाकरे यांना समज देतानाच आचारसंहितेचा अतिरेक झाल्याचे वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांची नीला सत्यनारायण यांनी कानउघाडणी केली. परंतु आचारसंहितेबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सर्वाधिक दक्ष असल्याचे सांगून पवार यांची प्रशंसा केली. सांगलीच्या नाट्य संमेलनावर आचारसंहितेचे सावट पडल्यामुळे "आचारसंहितेचा अतिरेक' झाल्याचे वक्तव्य आर. आर. पाटील यांनी केले होते. त्याबाबत सत्यनारायण यांनी गृहमंत्री पाटील यांना जाब विचारला. वक्तव्यावर आपण ठाम आहोत. चूक आमचीच झाली, कारण शासनानेच आचारसंहिता बनविली, असे आर. आर. पाटील म्हणाले. त्यावर आचारसंहिता तुम्ही बनविली नसून, ती निवडणूक आयोगाने बनविली आहे. सर्वांना शिस्त पाळण्यासाठी तिचा वापर करण्यात येतो. जे आदेश आहेत ते वैयक्तिक नसून आयोगाचे असल्याचे सत्यनारायण यांनी आर. आर. पाटील यांना सांगितले. त्यानंतर पाटील यांच्या खासगी सचिवांना आयुक्तांनी बोलावून घेतले.