मुंबई - कोलकाता पोलिसांच्या "स्पेशल टास्क फोर्स'ने बनावट नोटांच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत मुंबईत तिहेरी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दहशतवाद्यांचे धागेदोरे उघडकीला आले. कोलकाता पोलिसांनीच दिलेल्या माहितीवरून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) या दहशतवाद्यांपर्यंत पोचता आले, असे पोलिस दलातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबईतील 13/7 चे साखळी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध "एटीएस'कडून सुरू होता. कसून प्रयत्न करूनही एटीएसच्या हाती झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथील "सीसी टीव्ही' चित्रणात सापडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चेहऱ्यांशिवाय अन्य काहीही लागले नव्हते. या बॉम्बस्फोटांच्या दोन महिन्यांनंतर गेल्या सप्टेंबरमध्ये कोलकाता पोलिसांनी पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्या वेळी अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीत दिल्ली पोलिसांनी अटक केलेला "इंडियन मुजाहिदीन'चा दहशतवादी मोहम्मद कतिल सिद्दिकीचे नाव पुढे आले.