मुंबई - शिवसेनेतील नाराजांच्या यादीत आता माजी महापौर दत्ता दळवी यांची भर पडली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत इतक्या वर्षात आपल्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. बाहेरून आलेल्यांनी आपल्याला आदेश देऊ नये, असा चढा सूर त्यांनी लावला आहे. माजी महापौर दत्ता दळवी यांचे पुत्र गौरव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ दळवीही शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच वेळी त्यांनी जाहीरपणे पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. आपल्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट देताना असंख्य अडथळे आणण्यात आले. विधान परिषदेवर पाठविले जाण्याची अपेक्षा नव्हती पण संघटनेत एखादे पद मिळावे, अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षाही पूर्ण होऊ शकली नाही, अशी खंत दळवींनी प्रकट केली. यापुढे फक्त शिवसेनाप्रमुख आणि कार्याध्यक्षांचे आदेश ऐकू. त्यांच्याव्यतिरिक्त कोणाचेही आदेश ऐकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. विक्रोळी येथून महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी दळवी इच्छुक होते मात्र त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.