मुंबई - मुंबईतील 13/7 च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी 18 राज्यांत केलेल्या सहा महिने आणि 10 दिवसांच्या प्रदीर्घ तपासानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तिघांना अटक करून, या स्फोटांची उकल केली. "इंडियन मुजाहिदीन'चा म्होरक्या यासीन भटकळ याने "दरभंगा मॉड्युल'च्या मदतीने हे मृत्यूचे तांडव घातल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, यासीन भटकळ आणि बॉम्ब ठेवणारे दोन दहशतवादी अद्याप फरारी असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. एटीएसने या दोन दहशतवाद्यांची नावे उघड केली नसली तरी ते भायखळ्यातील "हबीब अपार्टमेंट'मध्ये वास्तव्य केलेले वकास व तबरेज हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस व दादर कबुतरखाना येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांत 27 जणांचा मृत्यू तर 127 जण जबर जखमी झाले होते. त्या स्फोटांत वापरलेली स्फोटके आणि दहशतवाद्यांची कार्यपद्धती लक्षात घेता, "इंडियन मुजाहिदीन'नेच हा घातपात घडविल्याचा अंदाज स्फोटांच्या दिवसापासूनच वर्तविण्यात येत होता.