मुंबई - मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला नकी अहमद वसी अहमद शेख (वय 22) हा गहूर जमाली या दहशतवाद्यामुळे "इंडियन मुजाहिदीन'च्या संपर्कात आला. जमाली सध्या दिल्ली पोलिसांच्या अटकेत असून, नकीने जमालीसोबत प्राथमिक शिक्षण घेतले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मुंबई गुन्हे शाखेने 2008 मध्ये "इंडियन मुजाहिदीन'चे नेटवर्क उधळून 28 जणांना अटक केली होती. त्यानंतर यासीन भटकळने बिहारमधल्या दरभंगा येथील तरुणांना 'इंडियन मुजाहिदीन'मध्ये सामील करून इंडियन मुजाहिदीनचे नवे "दरभंगा मॉड्युल' तयार केले. त्या वेळी जमाली इंडियन मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला. दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या स्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी नुकतीच सहा दहशतवाद्यांना अटक केली होती त्यात जमालीचाही सहभाग आहे. अटकेपूर्वी जमाली पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अदील ऊर्फ अजमल याच्या मदतीने पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षणासाठी जाणार होता. जमालीने त्याचे प्राथमिक शिक्षण ज्या मदरशातून घेतले होते, त्याच मदरशात नकीनेही त्याच्यासोबत शिक्षण घेतले होते. तेव्हापासून या दोघांची ओळख आहे.