मुंबई - खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात गेल्याने शिवसेनेचे एकही मत कमी होणार नाही. मात्र त्याच वेळी हे महाशय राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही एक दिवस टांग मारतील, अशी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परांजपे यांच्यावर केली आहे. त्याच वेळी असे टांग मारणारे अनेक आले आणि गेले, तरी शिवसेनेला कोणताही फरक पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे आनंद परांजपे यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नसल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे पण त्याच वेळी त्यांच्यावर मुखपत्रातून थेट अग्रलेख लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेससह परांजपे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर शिवसेनाप्रमुख म्हणून आपण कधीही आयाराम-गयारामच्या पद्धतीला प्रोत्साहन दिले नसल्याचा दावाही केला आहे. सत्तेतून आलेल्या पैशाच्या माध्यमातून माणसे आणि घरे फोडण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. शिवसेनेने अनेक निवडणुका जिंकल्या पण शिवसेनेला कधी पैसे वाटण्याची वेळ आली नाही. मराठीचा विचार महाराष्ट्रात रुजविल्याने शिवसेनेला यश मिळाले आहे. लाखो शिवसैनिक म्हणजे माझा आनंद असून, हा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.