पुणे - आपल्या समर्थकांसह नातेवाइकांना उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसच्या निवड मंडळात सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. प्रभागानुसार नेते वादावादीतून सभात्याग करीत होते. त्यामुळेच दर पाच मिनिटांनी एका नेत्याचा सभात्याग अशा वातावरणात अखेर चाळीस ते पंचेचाळीस नावांवर एकमत झाले आणि बैठक संपली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकार यापूर्वी एकहाती खासदारांना दिले जात होते. मात्र, त्यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे उमेदवार निवडीसाठी निवड मंडळाला अधिकार देण्यात आले आहेत. या निवड मंडळावर कलमाडी समर्थकांचे वर्चस्व आहे. एकहाती कारभार नसल्यामुळे आपल्या समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी आता निवड मंडळातच वाद सुरू झाले आहेत. आज दुपारी निवड मंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात विद्यमान नगरसेवकांची नावे निश्चित करून त्यावर निर्णय घेऊन जाहीर करण्याचे ठरले होते. बैठकीच्या सुरवातीला शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी काही नावे वाचून दाखविण्याचा प्रयत्न केला. तेथेच पहिली ठिणगी उडाली. कोणतेही नावे अंतिम करण्याऐवजी प्रत्येक नावावर मेरिटनुसार चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह मोहन जोशी यांनी धरला. तेथून वादाला सुरवात झाली.