Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दहावीच्या गुणपत्रिकेच्या प्रिंटवर तात्पुरते प्रवेश?

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:40 PM (IST)
मुंबई - दहावीच्या ऑनलाईन निकालाच्याच दिवशी संगणकावरून निकालाच्या 'प्रिंट' घेऊन, त्याद्वारे विद्यार्थी अकरावी ऑनलाईन प्रवेशांच्या प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकतील. मूळ गुणपत्रिका मिळेपर्यंत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया थांबविण्याची आवश्‍यकता त्यामुळे भासणार नाही, असा प्रस्ताव राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्य सरकारला लवकरच सादर केला जाणार आहे, अशी माहिती बोर्डातील उच्च अधिकाऱ्यांनी दिली. दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर साधारणपणे 10 दिवसांनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये मूळ गुणपत्रिका मिळते. विद्यार्थ्यांना निकाल झटपट कळावा, याकरिता मागील दोन वर्षांपासून मंडळाने ही सोय केलेली आहे. मात्र ऑनलाईन निकाल ते गुणपत्रिका मिळण्याचा 10 दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे. तो अकरावी ऑनलाईन प्रवेशांच्या मार्गात अडथळा ठरत असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. ऑनलाईन प्रवेशांच्या मोठ्या कालावधीमुळे अकरावीचे वर्ग सुरू होण्यास आणि पुढे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास विलंब होतो.