Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

आत्मघातकी पलायनवाद

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:25 PM (IST)
स्वतःचे अस्तित्व टिकविणे आणि ते अधिक सुरक्षित आणि सुखी करण्यासाठी माणसाची अखंड धडपड रोजच सुरू असते. कारण त्याच्या मुळाशी असते ती जगण्याची मूलभूत प्रेरणा. त्यावरही जेव्हा घाला घातला जातो, तेव्हा नक्कीच काही तरी गंभीर असे भावनिक, मानसिक असंतुलन निर्माण झालेले असते. त्यामुळेच आत्महत्येच्या घटनांचा समाज म्हणूनही गांभीर्याने विचार करावा लागतो. पुण्यात अरुण पालकर या तरुणाने पत्नी आणि दोन छोट्या मुलांना मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांत पुण्यातच घडलेली अशा प्रकारची ही दुसरी घटना. अशा घटनांना "सामूहिक आत्महत्या' असे अगदी सहजपणे संबोधले जाते परंतु हा शब्दप्रयोग चुकीचा आहे कारण "सामूहिक' म्हणजे प्रत्येकाने विचारपूर्वक घेतलेला निर्णय. मात्र अशा प्रकारच्या बऱ्याच घटनांमध्ये तसा सामूहिक विचार वगैरे काहीही नसतो, तर तो कुटुंबप्रमुखाचाच (अ)विचार असतो. पालकर यांनी वैयक्तिक आयुष्यातील सर्वच प्रश्‍न एका झटक्‍यात "संपवून' टाकण्याचा जो प्रयत्न केला, तो समाजापुढे अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न समोर आणणारा ठरला आहे. विविध प्रापंचिक अडचणींमुळे, विसंवादांमुळे ते कमालीचे त्रासलेले होते, असे उपलब्ध माहितीवरून दिसते.