पुणे - महापालिका निवडणुकीसाठी आजपासून (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असला तरी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे धाडस दाखविलेले नाही. महायुतीतील जागावाटपाचा तिढा, कॉंग्रेसमधील गटबाजी, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांची वाढलेली संख्या, मनसेची "प्रतीक्षा' यामुळे आणखी दोन दिवस कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची चिन्हे नाहीत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी आघाडी घेतली होती. भाजप आणि कॉंग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पूर्ण झाल्या. शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. काही मोजक्या प्रभागांवरील निर्णय पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी घेणार आहेत. त्यातच आरपीआयला कोणत्या किती जागा द्यायचा, हे अजूनही गुलदस्तात आहे, तो निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा लागणार आहे. आरपीआयला दिल्या जाणाऱ्या जागांच्या ठिकाणी होणारी बंडखोरी टाळण्यासाठी या जागांची घोषणा उशिरा केली जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या "कार्ड कमिटी'ची बैठक कॉंग्रेस भवनमध्ये झाली. यात काही उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.