मुंबई - मुंबईतील 13/7 च्या तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दहशतवाद्यांना झालेल्या अर्थपुरवठ्याचा माग राज्य पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सुरुवातीपासून घेत होते. या स्फोटांसाठी 10 लाख रुपये खर्च आल्याचे तपासात उघड झाले आहे. हा अर्थपुरवठा आखाती देशांतून हवालामार्गे करण्यात आल्याचे एटीएसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी दहशतवाद्यांना झालेला अर्थपुरवठ्याचा स्त्रोत उघडकीला आणणे एटीएससाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच गेले काही महिने सातत्याने केलेल्या तपासातून स्फोटांच्या तयारीसाठी लागणारा पैसा कुठून आला, तो कोणी घेतला तसेच त्याचा वापर कशा प्रकारे केला, याची सखोल माहिती एटीएसने मिळविली आहे. त्यातील दीड लाख रुपये यासिन भटकळने नकी अहमदला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. नकी अहमदने ही रक्कम भायखळ्यातील हबीब इमारतीत यासिन आणि त्याच्या दोन दहशतवादी साथीदारांना भाड्याने घर मिळवून देण्यासाठी घरमालकीण रुबिना शेखला दिले होते. दहशतवाद्यांच्या अर्थपुरवठादाराची माहिती एटीएसला असून, त्याचा शोध सुरू आहे.