मुंबई - मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादरमध्ये 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकांच्या (एटीएस) विविध पथकांनी 18 राज्यांतील विविध ठिकाणांची झाडाझडती घेतली. या ठिकाणांवर एकाहून अधिक वेळा ही पथके गेली असल्याचे एटीएसप्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले. मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास 18 जुलै 2011 रोजी एटीएसकडे अधिकृतरीत्या आल्यानंतर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकांनी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस व दादर या तीन घटनास्थळांवरील 180 सीसीटीव्ही चित्रीकरणांची विशेष तपासणी केली. सीसीटीव्ही चित्रीकरणाची 29 दिवस अविरत तपासणी केल्यानंतर स्फोटांशी संबंधित महत्त्वाचे धागे एटीएसच्या हाती लागले. त्यात झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथे बॉम्ब ठेवणारे पाकिस्तानी दहशतवादी तबरेज व वकास या दोघांची ओळख पटली. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये स्फोटांसंबंधीचे सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर बिहार येथील दहभंगा येथे विशेष पथक पाठविण्यात आले. त्यात नकी शेख व नदीम शेख या दोघांना अटक करण्यात आली. आतापर्यंत एटीएसने मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी 12 हजार 373 साक्षीदारांची जबानी नोंदविली आहे.