मुंबई - राज्य मराठी विकास संस्था आणि सी-डॅक (मुंबई) च्या वतीने मराठी संकेतस्थळांची स्पर्धा होणार आहे. सरकारी संकेतस्थळे, अशासकीय संकेतस्थळ, मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळे तसेच इतर संकेतस्थळे अशा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 31 जानेवारीपर्यंत www.rmvs.maharashtra.gov.in या लिंकवर प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धेत सहभागी होणारे संकेतस्थळ हे मुख्यत्वे मराठीत हवे. त्याचप्रमाणे राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 2006 ते 2010 दरम्यान स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांना पुन्हा या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. संकेतस्थळांची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, संकेतस्थळावरील सामग्रीची उपयुक्तता, अद्ययावतता, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय, माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा इ. निकषांवर तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल. त्याचप्रमाणे युनिकोड संकेतप्रणाली वापरून तयार केलेल्या संकेतस्थळांना प्राधान्य देण्यात येईल.