मुंबई - दादर येथील शिवाजी पार्क मैदान निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी मिळणे कठीण झाले आहे. या मैदानासाठी मनसे न्यायालयात गेली असली, तरी शिवसेनेने वांद्रे-कुर्ला संकुलाचा पर्याय स्वीकारला आहे मात्र शिवाजी पार्क वर्षातील फक्त 30 दिवसच खेळांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी वापरता येत असल्याने मनसेलादेखील ते मैदान मिळणे मुश्कील झाले आहे. शिवसेनेनंतर मनसेने शिवाजी पार्कवर हक्क गाजवण्यास सुरुवात केली मात्र ते मैदान वर्षातील फक्त 30 दिवस खेळांशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी वापरण्याची परवानगी आहे. त्यातील अनेक दिवस आधीच ठरवण्यात आले आहेत. यामुळे शिवसेनेने शिवाजी पार्कसाठी हट्ट न धरता पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा वांद्रे-कुर्ला संकुलात घेण्याचे ठरवले आहे पण मनसेने मात्र उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र ते मैदान मनसेलाही मिळणे कठीणच असल्याचे सध्या दिसते. मैदान भाड्याने देण्याचे दिवस यापूर्वीच ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार नियोजन केले जाते. यामुळे निवडणुकीच्या प्रचासभेसाठी शिवाजी पार्क दिले जाणे कठीण असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले.