Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा समाजसेवेची चांगली संधी - सज्जनसिंग चव्हाण
Mahanews
Tuesday, November 30, 2010 AT 10:53 AM (IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत भारतात २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन करणारे "सज्जनसिंग चव्हाण." 'डीआरडीओ अग्नी ऍवॉर्ड २००६' पुरस्कार विजेत्या सज्जनसिंग यांनी मुलाखतीत परीक्षेच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रश्न -: तुमची कौटुबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण या विषयीची कल्पना आम्हाला द्याल का ?
उत्तर -: मुंबईत गोरेगाव येथील आरे कॉलनी येथे माझा जन्म झाला आणि माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव येथे पूर्ण झाले. माझ्या वडिलांचे शैक्षणिक क्वालिफिकेशन म्हणजे त्यांनी आयटीआय इलेक्ट्रोप्लेटिंग केले होते. नेव्हल डॉकयार्डमध्ये चार्जमन या पदावर ते कामाला होते. दहावीपर्यंतचे माझे सर्व शिक्षण मुंबईत झाले आणि कामाक्षी एज्युकेशन सोसायटी, फोंडा, गोवा येथे ११वी १२वी म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. माझ्या घरी माझे आई, वडील, भाऊ, बहीण, माझी पत्नी माया आणि २ मुले आहेत. माझा एक मुलगा सहा वर्षाचा आणि दुसरा दोन वर्षाचा आहे.

प्रश्न -: त्यानंतर तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कुठे घेतलेत ?
उत्तर -: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून बी.ई.मेकॅनिकल इंजिनिअरींगचे पदवी शिक्षण पूर्ण झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आय.आय.टी.दिल्ली येथून. एम.टेक. प्रॉडक्शन हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

प्रश्न -: पंतप्रधानांच्या वतीने 'डीआरडीओ अग्नी ऍवॉर्ड २००६' तुम्हाला मिळाले होते. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. हे ऍवॉर्ड कशाकरिता मिळाले?
उत्तर -: मी २००१ पासून डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये आहे. त्यांची एआरडी ही एक संस्था पुण्यामध्ये आहे. त्या ठिकाणी मी वैज्ञानिक या पदावर काम करतो आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला २००१ ते २००४ या ४-५ वर्षात जे आमच्या टीमचे काम होते त्यातून आम्ही जे काही प्रॉडक्टस् तयार केले होते त्यामुळे परकीय चलनाची फार मोठय़ा प्रमाणात बचत झाली होती. अराऊंड १२५ कोटी रुपयांच्या परकीय चलनाची आम्ही बचत करु शकलो. त्याचेच ऑप्रिसिएशन म्हणून आम्हाला पंतप्रधानांकडून हा ऍवॉर्ड मिळाला.

प्रश्न -: या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसून प्रशासनात करिअर करण्याच्या तुमच्या प्रयत्नाविषयी
उत्तर -: यावर्षी माझी ऑल इंडिया रँक २९ आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून माझा दुसरा क्रमांक आहे. हा माझा तसा पाचवा प्रयत्न होता. आधीच्या चारही प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पास होऊ शकलो नव्हतो. नोकरी करत असल्यामुळे अभ्यासाला खूप कमी वेळ मिळायचा आणि दरवर्षी फक्त एक आठवडा सुट्टी काढून पूर्व परीक्षेला बसत होतो. मी जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषय निवडला होता तो एक प्रकारे जरा माझा चुकीचा निर्णय होता. या पाचव्या प्रयत्नात मी तो विषय बदलला आणि इतिहास हा विषय निवडला. त्यातून मला पूर्णपणे यश मिळाले व मी पहिल्यांदा पूर्व परीक्षा पास झालो आणि माझे अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत सिलेक्शन होऊन २९ वा रँक मिळाला.

प्रश्न -: तुम्ही एक वैज्ञानिक आहात. तरी देखील तुम्हाला आपण प्रशासकीय सेवेत जावे असे सारखे का वाटत होते ?
उत्तर -: माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन असे वाटले की, मी जे वैज्ञानिक म्हणून काम करतो आहे त्याचा अंतिम प्रभाव खूप लिमिटेड स्पिअरमध्ये आहे. तेवढेच काम जर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून केले तर त्याचा इम्पॅक्ट समाजातील मोठय़ा घटकावर पडेल आणि आपले जे निर्णय आहेत, ज्या शासकीय योजना आपण राबविणार आहोत त्याचे इम्प्लिमेंटेशन खूप योग्य त-हेने करुन समाजासाठी जास्तीतजास्त उपयोग होईल. आधीपासून समाजाची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून मी या घटकाकडे वळलो.

प्रश्न -: पूर्व परीक्षेला नेमका कसा अभ्यास केला?
उत्तर -: सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे पूर्णपणे विश्लेषण झाले पाहिजे. पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय हे वेगवेगळे घटक असतात. माझा वैकल्पिक विषय इतिहास होता. त्यात स्पेसिफिक अशी ट्रेंड असते. ती लक्षात आली पाहिजे. या परीक्षेत पास होण्यासाठी काही महत्वाची पुस्तकेही असतात. ठराविक पुस्तकांचे सतत वाचन केल्यामुळे त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये ते खूप डीटेलमध्ये प्रश्न विचारतात. प्रश्नांचा एकंदरीत अंदाज मला आला की, कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि त्यामुळे मी पूर्व परीक्षेत यशस्वी होऊ शकलो.

प्रश्न -: मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही ऐच्छिक विषय इतिहास घेतला होतात. त्याचा नेमका अभ्यास कसा केलात?
उत्तर -: काही क्लासेसकडून मार्गदर्शन घेऊन मी तो विषय निवडला. काही महत्वाच्या सात-आठ पुस्तकांचा मी व्यवस्थित अभ्यास करुन ठेवला. म्हणजे प्राचीन भारत, मध्य भारत आणि आधुनिक भारत यासारखे घटक मी व्यवस्थित करुन ठेवले.

प्रश्न -: इतिहास विषयाचे आपल्या आजच्या जीवनात नेमके काय योगदान आहे?
उत्तर -: हो. त्याचा खूप मोठा संबंध आहे. कारण इतिहास आणि सध्याची सामाजिक जडणघडण त्यामध्ये खूप मोठी लिंक आहे. आपण सध्या ज्या गोष्टी अनुभवतो किंवा पाहतो त्याची काहीतरी पाळेमुळे आधीच्या इतिहासात असतात. सामाजिक समानता किंवा विषमता असेल किंवा आर्थिक व्यवस्था असेल, समाजाची राजकीय, आर्थिक जडणघडण हा विषय असेल किंवा एकंदरच जाती व्यवस्थेचा उगम कसा झाला हा विषय असेल आणि काही क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेली दिसते. काही क्षेत्रे अतिशय मागासलेली दिसतात. त्याची सगळी मुळे जी आहेत ती इतिहासात दिसतात.