Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
ऐवज - दिवाळी अंक: संपादक -अरुण शेवते
Mahanews
Thursday, November 04, 2010 AT 10:55 PM (IST)

दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे, असं आपण सहज आणि अभिमानानं म्हणू शकतो! त्याचं कारण म्हणजे थोडीथोडकी नव्हे तर चांगली शंभर वर्षं हे वैशिष्ट्य टिकून आहे. या शंभर वर्षांच्या काळात मराठी बाणा, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृती यावर चोहोबाजूंनी आक्रमणं होत राहिली. त्यांना अनेक आघात सहन करावे लागले. अर्थात, तरीही त्यातून या सार्‍या गोष्टी ‘श्रीशिल्लक’ म्हणून टिकून उरल्याच. एवढेच नव्हे तर त्या शंभर वर्षांत झालेले आघात आणि अस्तित्वासाठी करावा लागलेला अकटोविकट संघर्ष यातून तो मराठी बाणा, ती मराठी भाषा आणि ती संस्कृती अधिकच तावून सुलाखून आणि झळाळून बाहेर पडल्या. सोनाराच्या मुशीतून बाहेर पडणार्‍या लखलखत्या आणि झगमगत्या सुवर्णप्रमाणे...

मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला तो गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या अखेरीस. काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी ‘मनोरंजन’ नावानं एक अंक दिवाळीच्या मुहुर्तावर प्रसिद्ध केला आणि मराठी माणसाच्या हातात अचानक एक आनंदाचे निधानच आले. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंड सुरू आहे आणि दरवर्षी दिवाळी अंकांच्या संख्येतही मोठी भर पडत चालली आहे. दसर्‍याचं सोनं लुटलं की सुजाण आणि साहित्यप्रेमी मराठी माणसाला दिवाळी अंकांचे वेध लागतात. दरम्यान दिवाळी अंकांच्या जाहिरातीही हळूहळू सुरू झालेल्या असतात. त्या बघून त्याची उत्सुकता तर जागृत होत जातेच शिवाय तो कोणते आणि किती अंक घ्यायचे याचा ताळेबंदही मनातल्या मनात मांडू लागतो. मराठी माणसाच्या मनात उत्सुकता निर्माण करणारे अनेक अंक आहेत. त्यात अर्थातच मौज, दीपावली, श्रीदीपलक्ष्मी, साधना, माणूस, धनुर्धारी, ललित, आवाज, अक्षर, अशा अंकांची प्रदीर्घ काळची परंपरा समाविष्ट आहे. त्याशिवाय, प्रपंच, माहेर, मेनका, जत्रा अशा अंकांचा वेगळा बाज आहेच. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना, लोकमत अशा काही प्रति‰त दैनिकांचे दिवाळी अंकही स्मरणात राहणारे असतात. पण अशा या दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे आपलं वेगळेपण टिकवून धरणारा आणखी एक अंक आहे. त्याचं नाव ‘ऋतुरंग’. 

अरुण शेवते नावाचा एक कलंदर कवी आणि लेखक गेली काही वर्षे सातत्याने हा अंक प्रकाशित करत आहे. खरं तर मुळात अहमदनगरसारख्या शेती-सहकार आणि साखर यामुळे समृद्ध झालेल्या जिह्यातल्या या तरुणाच्या मनात ऊसाऐवजी दिवाळी अंक केवळ वाचण्याचंच नव्हे तर प्रकाशित करण्याचं वेड कसं निर्माण झालं, हे एक कोडंच आहे. पण ते होतं मात्र खरं. अहमदनगर जिह्यात वास्तव्य असतानाच हा युवक ‘पैस’ या नावानं एक अंक प्रकाशित करत असे. पुढे कायमच्या वास्तव्यासाठी शेवते यांनी मुंबईची निवड केली, तरी त्याच्या डोक्यातून हे साहित्याचं, कथा-कवितांचं वेड गेलं नव्हतं. उलट ते वाढतंच होतं आणि त्यातूनच त्यांचा गुलज़ार यांच्यासारख्या कलंदर व्यक्तिमत्त्वाशी दोस्तानाही जमून गेला. अखेर मुंबईतही शेवते यांनी दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं. बारसं झालं. ऋतुरंग.

पण शेवते यांनी दिवाळी अंकात बाकी संपादक देत असलेल्या पचरंगी, बहुढंगी, नानागुणी फराळापेक्षा काही तरी वेगळं वाचकांना द्यायचा निर्णय घेतला आणि त्यातूनच ‘एक विषय, एक अंक’ ही कल्पना जन्मास आली. शेवते यांच्या पहिल्याच अंकाचा विषय होता ‘ते दिवस असे होते...’ . पुढे शेवते सातत्याने वेगवेगळे विषय काढून आणि मुख्य म्हणजे वेगवेगळय़ा स्तरावरील लोकांना लिहितं करून सातत्यानं अंक प्रकाशित करत राहिले. कधी त्यांनी लेखकांना आपल्या मित्रांवर लिहायला लावलं, तर कधी आपल्या घरावर, तर कधी आईवर... पण यात विशेष काय, असं कोणीही विचारू शकेल. विशेष होतं, ते लिहिणार्‍यांमध्ये. त्यामुळेच त्या आठवणी वेगळय़ा ठरत आणि मनात कायमच्या दडून राहत. पण दिवस जसजसे जात गेले, तसतसं विषयांच वेगळेपण ‘ऋतुरंग’मध्ये जाणवत गेलं. ‘रंगल्या रात्री अशा’ हा खरं तर दिसायला अगदी साधासुधा विषय. पण शेवते यांनी त्यावर लिहितं केलं ते यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर आणि सुरेखा पुणेकर अशा मातब्बर कलावंतांना. आणखी एक विषय कोणाच्याही भुवया उंचावणारा होता. ‘मी आणि माझं मद्यपान!’ त्यात मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, के. ज. पुरोहित तथा शांताराम यांच्यापासून दिनकर रायकर यांच्यासारख्या पत्रकारापर्यंत अनेकांनी आपले दारूकामाचे अनुभव त्यात शब्दांकित केले होते. सतरा वर्षांच्या काळात शेवते यांनी असे अनेक विषय काढले आणि त्यातून पुढे अनेक वर्षं मनाच्या गाभार्‍यात आठवणींची रुंजी घालणारे लेख तयार झाले.

पण दिवाळी अंकांचं हे जेमतेम चार महिन्यांचं असतं. नवं वर्ष सुरू होतं आणि नव्यानं दिवाळी अंकांची तयारी सुरू होते. नवनवे लेख लिहिले जातात आणि आठवणीत रुतून बसतात. पण मध्येच एखाद्या कातरक्षणी त्या जुन्या लेखाची आठवण आली, तर तो जुना अंक कोठून मिळणार? हा प्रश्न आता सुटला आहे कारण ‘ऋतुरंग’च्या सतरा वर्षांच्या प्रवासातील आठवणींचा ‘ऐवज’ अत्यंत देखण्या स्वरूपात शेवते यांनी प्रसिद्ध केला आहे. अर्थात दिवाळी अंकांतील लेखांचं संकलन पुस्तकरूपानं प्रकाशित करण्याची प्रथा नवी नाही. यापूर्वी श्रीदीपलक्ष्मी, धनंजय, आवाज अशा काही अंकांमधील लेखांचं संकलन प्रसिद्ध झालेलं आहे. पण ‘ऐवज’ या अरुण शेवते यांनी संपादन केलेल्या ग्रंथाचा बाज पुरता वेगळा आहे. त्यामुळेच कोणत्याही सुजाण वाचकाच्या घरी तो ‘ऐवज’ असायलाच हवा. 

- प्रकाश अकोलकर

दिवाळी अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :